अमळनेर :- आझाद नायक न्युज
अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष स्नेहमिलन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वर्गाच्या अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पाडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गुरुवंदनेने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि उत्तम सादरीकरण उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरले.
विद्यार्थ्यांकडून गुरुऋणाची आठवण-शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील स्थान आणि मार्गदर्शन यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना शब्दबद्ध केल्या. ममता चौधरी, मोहन पाटील, प्रेम मोरे, भाग्यश्री मांडोळे आणि लक्ष्मी महाजन यांनी शिक्षकांविषयीच्या आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अनमोल मार्गदर्शन केले. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, फार्मसी क्षेत्रातील नव्या आव्हानांना कसे सामोरे जावे आणि करिअर घडवताना नैतिक मूल्यांची जपणूक कशी करावी, याचे महत्त्व पटवून दिले. केवळ परीक्षेत यश मिळवणे इतकेच ध्येय न ठेवता, एक संवेदनशील आणि जबाबदार आरोग्यसेवक (हेल्थकेअर प्रोफेशनल) म्हणून समाजात वावरण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला.
विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या आदरामुळे आणि कृतज्ञतेच्या भावनेमुळे सर्व शिक्षकवृंद भारावून गेले होते, तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्या साठी भरभरून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. डॉ. एम. एस. वाघ सर यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य संदेश दिला. ते म्हणाले, "गुरु आणि शिष्य यांचे नाते हे केवळ वर्गापुरते मर्यादित नसून ते आयुष्याला दिशा देणारे असते. फार्मसी क्षेत्रात काम करताना प्रामाणिकपणा, संयम आणि सेवाभाव बाळगणे अत्यंत गरजेचे आहे." त्यांनी विद्यार्थ्यांच्या या सुंदर उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ममता चौधरी यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थ्यां चे मनःपूर्वक आभार मानले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या दैनंदिन काम काजात दिलेल्या सहकार्याचा ही त्यांनी विशेष उल्लेख केला.
0 Comments