Header Ads Widget

Responsive Image

आझाद नायक न्यूज | ब्रेकिंग न्यूज मध्यरात्री अमळनेर पोलिसांचे धडक कोंबिंग ऑपरेशन; २४३ जणांवर कारवाई, गावठी कट्टा, तलवार, दारू व जुगार प्रकरणी गुन्हे दाखल

 अमळनेर | प्रतिनिधी :- मुकेश भावसार, पंकज भावसार
अमळनेर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांनी मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन राबवत अवघ्या २४ तासांत तब्बल २४३ विविध प्रकारच्या कारवाया केल्या. या धडक मोहिमेत एक गावठी कट्टा, एक तलवार जप्त करण्यात आली, तसेच गावठी दारू व जुगाराशी संबंधित १४ गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज, नामदेव बोरकर, भगवान कोळी, कविता ठाणगे तसेच एलसीबी व स्थानिक पोलिसांचे सुमारे ७० अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
पैलाड, गांधलीपुरा, झामी चौक, जपान जीन परिसरासह ग्रामीण भागात छापेमारी करून २५ हिस्ट्रीशीटरांच्या घरांची, १६ हॉटेल व लॉजची तपासणी करण्यात आली. तसेच १०० गुन्हेगारांची घरझडती घेण्यात आली असून त्यापैकी ५२ जण आढळून आले.
यावेळी ६० जणांवर भारतीय न्यायसंहिता कलम १२६ व १२९ अंतर्गत प्रतिबंधक कारवाई, १५ जणांना NBW, ६ जणांना BW आणि २१ जणांना समन्स बजावण्यात आले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४० वाहनचालकांवर, सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या ७ जणांवर, तसेच ओव्हरलोड प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई करून एकूण ₹५१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
याशिवाय ९ गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या ३२ जणांवर कारवाई, ५ जणांविरुद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हे, तसेच तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या ३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
अमळनेर पोलिसांच्या या धडक कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
— आझाद नायक न्यूज

Post a Comment

0 Comments