पिंपरी - वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात रुग्णवाहिका चालक पदावर कॉल लेटर देतो,असे सांगत एकाकडून साडे सहा लाख रुपये उकळले.
त्यानंतर शासकीय अधिकारी व माजी मंत्र्याच्या बनावट व खोट्या सहीचे लेटर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी गणपत एकनाथ गीते (रा.नागेश्वरनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम सुनील पाटील (वय २६, रा. कृषीनगर, ढेकू रोड, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीस वैद्यकीय संशोधन व शिक्षण विभाग मुंबई यांच्याकडे रुग्णवाहिका चालक या पदावर कॉल लेटर देतो, असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरूपात एकूण सहा लाख ६६ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांच्या सहीचे व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांची खोटी व बनावट सही असलेले लेटर देऊन फिर्यादीला कर्तव्यावर रुजू करून केले. तसेच सौरभ विजय, सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र राज्य-मुंबई यांच्या सहीची बनावट व खोटी पत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवले. यातून फिर्यादीची दिशाभूल करून फसवणूक केली. हा प्रकार ९ मार्च ते २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत देहूगाव, विमाननगर, निगडी, नाशिक, आमदार निवास,मुंबई येथे घडला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पूर्ण शहानिशा केल्या शिवाय अश्या कुठल्याही भुलथापांना बळी पडु नये व असे जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर अगोदर पोलिसांशी संपर्क साधावा.
0 Comments