आझाद नायक न्युज :- धिरज बजाज हिवरखेड
हिवरखेड या महत्त्वाच्या शहरापासून अकोला या जिल्हा मुख्यालयी जाण्यासाठी थेट बस सेवा उपलब्ध होण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड द्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना यश आले असून हिवरखेड अकोला थेट बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड हे महत्त्वाचे शहर असून हिवरखेडला अनेक गावे संलग्न आहेत परंतु स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊनही हिवरखेड ते अकोला थेट बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला, व्यापारी, नियमित प्रवासी, व जेष्ठ नागरिकांना प्रचंड हेलपाटे घ्यावे लागत होते.
प्रवाशांचे हेलपाटे पाहून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेडच्या पत्रकार बांधवांनी अर्जुन खिरोडकार यांच्या पुढाकारातून हिवरखेड अकोला थेट बस सेवेसाठी पाठपुरावा सुरू केला. त्याला तेल्हाराचे कर्तव्यदक्ष आगार प्रमुख श्री. मिथुन शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यामध्ये तेल्हारा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद राठी यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष मनोहरराव सुने, प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, प. विदर्भ प्रमुख नाना भाऊ इंगोले इत्यादींच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड च्या पत्रकार बांधवांच्या प्रयत्नांना यश आले. आणि दिनांक 29 जून पासून हिवरखेड तेल्हारा मार्गे अकोला थेट बस सेवेचा शुभारंभ संपन्न झाला. त्यासाठी पत्रकार अर्जुन खिरोडकार यांनी विशेष परिश्रम घेतले.
माजी सरपंच संदीप इंगळे, अ. भा. ग्रामीण पत्रकार संघांचे तालुकाध्यक्ष अर्जुन खिरोडकार, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरज चौबे, मा. शहराध्यक्ष जितेश कारिया, अकोला जिल्हाध्यक्ष (प) धिरज बजाज इत्यादी मान्यवरांच्या हस्ते फित कापून, नारळ फोडून सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बस क्र. MH 40- Y 5348 या बसला हिरवी झेंडी दाखऊन बसफेरीचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज व माजी सरपंच संदीप इंगळे व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
बस शुभारंभ प्रसंगी पत्रकार संघटना व उपस्थित मान्यवरांतर्फे बसचे चालक व वाहक यांचा शॉल श्रीफळ हरार्पण करून भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी वाहतूक नियंत्रक सौ. सुप्रिया इंगळे मॅडम, व्यापारी संघटनेचे अतिश मदनलालजी बजाज, आनंद दिनेश अग्रवाल, प्राचार्य अरुण हागे, सागर उरकडे, अझहर खान, उमेश इंगळे, पत्रकार बांधव, प्रवासी, व्यापारी, आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते बसचे पूजन आणि हरार्पण करण्यात आले. यावेळी बस सेवा सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे उपस्थित प्रवाशांनी आभार व्यक्त केले. आणि या बस सेवेच्या फेऱ्या वाढाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली.
0 Comments