Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी शहरातील भुयारी गटार योजनेवर केले गंभीर प्रश्न उपस्थित..

अमळनेर :- आझाद नायक न्युज,  विकी भावसार, पंकज भावसार 

अमळनेरच्या भुयारी गटार योजनेवर संताप! ७० कोटींचा निधी वाया? मंत्र्यांसमोर थेट आरोप

जिल्हा आढावा बैठकीत पाणीटंचाई, महावितरण व प्रलंबित कामांवर जोरदार चर्चा; अधिकाऱ्यांना कडक सूचना!

महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री गुलाबरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, महावितरणच्या अडचणी तसेच नगरपरिषदांच्या प्रलंबित विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

बैठकीदरम्यान अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी शहरातील भुयारी गटार योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत थेट MGP वर आरोपांची सरबत्ती केली. गेल्या १० वर्षांपासून कार्यारंभ आदेश असूनही प्रत्यक्षात ८ वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील अनेक ठिकाणी गटार चेंबर तुंबलेले असून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. काही ठिकाणी तर भुयारी गटारीच्या नावाखाली नाल्यातच पाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला.

 तब्बल ७० कोटी रुपयांचा निधी खर्चूनही शहरातील रस्ते खोदलेलेच राहिले असून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही बैठकीत मांडण्यात आले.

  या गंभीर बाबींची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित MGP अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आणि सदरील योजना तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.

तसेच, अमळनेर शहरातील प्रस्तावित विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळावा यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेण्याचे संकेत दिले.

 यावेळी बैठकीस महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री संजयजी सावकारे, आमदार अनिल पाटील (अमळनेर), आमदार चंद्रकांत सोनवणे (चोपडा), आमदार अमोल जावळे (रावेर), जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments