लासलगाव | वार्ताहर
हिमालयाच्या कुशीत हेमंत भावसार यांची धाडसी मोहीम
६,५०० किमी मोटारसायकल प्रवास करून लडाख सर
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी एखादे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी जिद्द, धैर्य आणि चिकाटीची गरज असते. लासलगाव येथील हेमंत रविंद्र भावसार यांनी आपल्या मनातील लडाख भेटीचे स्वप्न अखेर पूर्ण केले आहे.
मोटारसायकलवरून तब्बल ६,५०० किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी लडाखचा खडतर आणि रोमांचकारी प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. दुर्गम रस्ते, उंच पर्वत, थंडी, पावसाचा सामना करत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली.
या मोहिमेदरम्यान त्यांनी समुद्रसपाटीपासून सुमारे १९,०२४ फूट उंचीवरील हिमांक (उमलिंगला) परिसरातील कठीण मार्गावर प्रवास केला. हा मार्ग जगातील सर्वात उंच मोटार वाहन चालवता येणाऱ्या रस्त्यांपैकी एक मानला जातो.
हेमंत भावसार हे मोटारसायकलिंगचे शौकीन असून, अनेक वर्षांपासून लडाख प्रवासाचे स्वप्न त्यांनी मनात जपले होते. अखेर त्यांनी धाडस, नियोजन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.
त्यांच्या या साहसी प्रवासाबद्दल लासलगाव परिसरातून तसेच मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि मोटार सायकल प्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जिद्द, धैर्य आणि स्वप्नपूर्तीचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून हेमंत भावसार यांची ही मोहीम कौतुकास्पद ठरत आहे.
0 Comments