अमळनेर नगरपरिषदचा राजाराम नगरमधील नागरिकांचा जीवाशी खेळ
नगरपरिषदचा गलिच्छ कारभार चव्हाट्यावर...
राजाराम नगरमध्ये गटारीमिश्रित पाणीपुरवठा – नागरिकांच्या जीवाशी खेळ
अमळनेर शहरातील राजाराम नगर परिसरात प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा कळस गाठल्याचे चित्र समोर आले आहे. मागील तब्बल बारा दिवसांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत असताना, अखेर दिलेले पाणी मात्र गटारीमिश्रित व दुर्गंधीयुक्त असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.नागरिकांनी स्वतः गटारीचे गढूळ, काळपट पाणी काढून दाखवत प्रशासनाचा निष्काळजी पणा जगजाहीर केला. नळातून येणाऱ्या पाण्याला तीव्र दुर्गंध येत असून ते पाणी पिण्यायोग्य तर दूरच, वापरण्यायोग्यही नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रकारामुळे परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नगरपालिका प्रशासन व पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा इतका वाढला आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी सरळ खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी ढिम्म असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
“बारा दिवस पाणी नाही, आणि जे दिलं ते गटारीचं!” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा सुरू करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजाराम नगरमधील नागरिकांनी दिला आहे.
0 Comments