विकी भावसार,परेश उदेवाल
अमळनेर नगरपरिषदेत खळबळ! सर्वसाधारण सभा न घेतल्याने नगराध्यक्षांवर कायदेशीर कारवाईची मागणी;
शहर विकास आघाडी आक्रमक
अमळनेर, ३० मार्च २०२६:
अमळनेर नगरपरिषदेच्या कारभारावरून नवा वाद पेटला असून, मार्च २०२६ महिन्याची सर्वसाधारण सभा कायद्याने बंधनकारक असतानाही ती घेण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. 'अमळनेर तालुका शहर विकास आघाडी'ने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत नगराध्यक्षांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ५१, ५२ व ५३ अन्वये, नगरपरिषदेची मागील सभा ज्या तारखेला झाली (२४ फेब्रुवारी २०२६) त्यापासून एका महिन्याच्या आत पुढील सभा घेणे बंधनकारक असते. मात्र, अमळनेर नगरपरिषदेची मार्च महिन्याची सभा २४ मार्च २०२६ पर्यंत घेण्यात आली नाही.
नगराध्यक्षांवर गंभीर आरोप
शहर विकास आघाडीने निवेदनात म्हटले आहे की, शहरात मूलभूत सुविधांसाठी अनेक समस्या, तक्रारी आणि विकासकामांचे मागणी अर्ज आले असतानाही, नगराध्यक्ष जाणीव पूर्वक सभा घेत नाहीत. नगराध्यक्ष आपल्या कर्तव्यातून आणि जबाबदारी तून पळ काढत असल्याने अमळनेरचे नागरिक मूलभूत सुविधा व विकास कामांपासून वंचित राहत आहेत, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष वाढला आहे
जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद
नियम व कायदेशीर शासन आदेश असतानाही परिषदेची सभा न घेता नियमभंग करणाऱ्या संबंधित जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या निवेदनावर सर्व नगरसेवकांच्या सह्या आहेत. या मागणीमुळे अमळनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
0 Comments