शालेय जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा वळणबिंदू असतो. शालेय जीवनातील अनेक सुंदर आठवणी अनुभव आणि शिकवण यांची शिदोरी त्यांना पुढील आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा देणारी ठरते.
तेव्हा ही त्रिवेणी शिदोरी घेऊन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत एक सुंदर प्रसंग म्हणजे निरोप समारंभ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ. ऐश्वर्या धारस्कर ह्या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून करिअर समुपदेशक कु.कोल्हे ह्या होत्या. तसेच संस्थेचे सल्लागार आ.श्री अनिरुद्ध चौधरी हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व शाळेच्या आद्य संस्थापिका कै. मनुताई बापट यांच्या पुतळ्यास हारार्पणाने झाली.
यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना भेटकार्ड देऊन नृत्य, गाणी व आपल्या मनोगता द्वारे आगामी शालांत परीक्षेकरिता व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यिनिंनी सुद्धा आपल्या शाळेतील आठवणी आणि अनुभव इत्यादी कथन केले ज्याने वातावरण अगदी भावनिक झाले.
यावेळी शाळेच्या आ.मुख्याध्यापिका सौ. ऐश्वर्या धारस्कर यांनी विद्यार्थिनींना पुढील आयुष्यात येणाऱ्या अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जा असे सांगत परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या तसेच शाळेतील शिक्षिका सौ. देशमुख यांनी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तर आयुष्यात थांबू नका.
असे मार्गदर्शन केले तर शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती मांगे यांनी परीक्षेला जातानांची तयारी कशी करावी याबाबत विद्यार्थिनींना सूचना दिल्या तसेच कॉपीमुक्त अभियानाद्वारे विद्यार्थ्यांना तणाव मुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे याकरिता कॉपीमुक्त शपथ शाळेतील शिक्षिका सौ राठोड यांनी दिली.
यावेळी शाळेतील विद्यार्थिनी द्वारा शाळेतच फुलविलेल्या परसबागेतील भाजीपाला वापरून तयार केलेल्या अतिशय रुचकर भोजनाचा संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मिळून भरपूर आस्वाद घेतला. यासाठी शाळेद्वारा सुरू असलेल्या प्लास्टिक मुक्त अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता स्नेहभोजनाकरिता प्लास्टिक युक्त ताट वाटी न वापरता स्टील वाटी व ताटांचा वापर करण्यात आला. आणि याकरिता श्री योगेश पालीवाल यांचे सहकार्य लाभले.शेवटी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी शाळेला भेटवस्तू प्रदान केली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments