Header Ads Widget

Responsive Image

“अमळनेर नगरपरिषदेत दुहेरी घोटाळा उघड! पाणीपुरवठा गैरप्रकार आणि जनरल मीटिंग नियमभंगावर जिल्हा प्रशासनाचा कडक फटका”

अमळनेर:- आझाद नायक न्युज
विकी भावसार,परेश उदेवाल

 अमळनेर नगरपरिषदेच्या कारभारा वर आता थेट जिल्हा प्रशासनाने चाबूक उगारला असून, पाणीपुरवठा गैरप्रकार आणि जनरल मीटिंग मधील गंभीर नियमभंग या दुहेरी वादामुळे प्रशासन अक्षरशः हादरले आहे. नागरिकांच्या हक्कांशी खेळ करणाऱ्या या प्रकरणांची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पाणीपुरवठा घोटाळा की सत्तेचा गैरवापर?
पाणीपुरवठा सभापती यांनी स्वतःच्या गावात — गांधली येथे — तापी नदीवरील मुख्य पाईपलाईनवरून थेट १ इंचाची स्वतंत्र लाईन जोडल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.
 हा पाणीपुरवठा शेतीसाठी वळवण्यात आल्याचे सांगितले जात असून, हा प्रकार म्हणजे सार्वजनिक संपत्तीवर डल्ला आणि पदाचा उघड गैरवापर असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

लोकप्रतिनिधींचा संताप उफाळला
या गंभीर प्रकरणावर नगरसेवक-नगरसेविकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत लेखी तक्रार सादर केली आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत दिलेल्या या निवेदना मुळे प्रकरण अधिकच तापले आहे. अनेक नगरसेवकांच्या सह्यांनी सजलेल्या तक्रारीत थेट अपात्रता आणि फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

 जनरल मीटिंगमध्येही नियमांचा चुराडा!
एकीकडे पाणीपुरवठा घोटाळा उघड होत असतानाच, नगरपरिषदेच्या जनरल मीटिंग प्रक्रियेतही गंभीर अनियमितता समोर आली आहे.
 ७ दिवसांत कार्यवृत्त प्रसिद्ध नाही
 ३१ दिवसांत पुढील सभा नाही
 पारदर्शकतेचा पूर्ण अभाव

हे सर्व नियम धाब्यावर बसवून नगरपरिषदेचा कारभार ‘मनमानी’ पद्धतीने चालवल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

कारवाई करण्याचे आदेश
जळगाव जिल्हा प्रशासनाने या दोन्ही प्रकरणांची तातडीने चौकशी सुरू करत संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे पाणीपुरवठा प्रकरणासाठी स्वतंत्र चौकशी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 नागरिकांचा सवाल – दोषींवर कारवाई की पुन्हा लीपापोती?
या सर्व घडामोडींमुळे अमळनेर नगरपरिषदेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि प्रामाणिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता नागरिकांची नजर जिल्हा प्रशासनाच्या पुढील कारवाईवर खिळली असून,
 दोषींना शिक्षा होणार की पुन्हा प्रकरण दाबले जाणार?
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.

 अमळनेरमध्ये राजकीय व प्रशासकीय भूकंपाचे संकेत – पुढील काही दिवस निर्णायक!

Post a Comment

0 Comments