अकोला :- आझाद नायक न्युज
मुकेश भावसार
गत २२ वर्षापासून राष्ट्रीय बालकल्याण व सामाजिक सेवेत राज्यभर सेवारत असणाऱ्या तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला च्या वतीने महानगरात आठ दिवशीय तीक्ष्णगत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युवक,युवती व महिला पुरुष नागरिकाच्या आरोग्यासाठी वॉकेथॉन तथा विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, नृत्य तथा वकृत्व स्पर्धा समवेत राष्ट्रीय गायक आदर्श शिंदे यांच्या बहारदार गीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तीक्ष्णगत मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उत्सवाचे संयोजक डॉ.सुगत वाघमारे यांनी दिली.शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित या आठ दिवशीय महोत्सवाची माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे एड संजय सेंगर, प्रा प्रदिप अवचार,शरद कोकाटे व कालाध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.बालकांचे भवितव्य व सामाजिक जबाबदारीचा उत्सव म्हणून आयोजित या महोत्सवाचा प्रारंभ रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी ६: ३० वाजता मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणातून वॉकेथॉन या आरोग्यदायी उपक्रमाने होणार आहे. तीक्ष्णगत फाउंडेशन समवेत राज्य बाल हक्क संरक्षण आयोग तथा पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने आयोजित या वॉकेथॉन मध्ये राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी नारा, दलित चेंबरचे संस्थापक चेअरमन पद्मश्री मिलिंद कांबळे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेता गौरव मोरे,जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याच दिनी सकाळी ८:०० वाजता टावर चौक परिसरातील लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे अकोला जिल्हा कलाध्यापक संघाच्या सहकार्याने रंगभरण, चित्रकला स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी होणार असून या ठिकाणी आठ दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.ही क्रिकेट स्पर्धा दिनांक १४ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत रोज सकाळी ९:३० वाजता गोरक्षण संस्था मैदान, गोरक्षण रोड येथे होणार आहे.महोत्सवात मंगळवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सायं ६:३० वाजता गोरक्षण रोड येथील मैदानात राष्ट्रीय गायक आदर्श शिंदे व त्यांच्या संगीत चमूचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम सर्व अकोलेकर नागरिकांसाठी होणार आहे.शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर रोजी सायं सहा वाजता रिंग रोड परिसरातील जानोरकर मंगल कार्यालयात स्व.सुरेश भट गझल मंच पुणे यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य गजल कार्यक्रम होणार आहे. शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस लॉन्स येथे युवक युवती व महिला पुरुषांसाठी खास भव्य नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. युवक, युवती व महिला पुरुषांच्या सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी संस्थेच्या वतीने हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये डान्स इंडियाच्या अंतिम फेरीतील स्पर्धक व महाराष्ट्र बेस्ट डान्सर शो विजेते दीपक हुलसुरे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. प्रत्येकाला वकृत्व कला जोपासता यावी व आपल्या बोलण्याच्या कलेला उजाळा मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय भव्य वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी स.९:०० वाजता LRT महाविद्यालया च्या सभागृहात राज्यस्तरीय मातृत्व करंडक वकृत्व स्पर्धा होणार असून यामध्ये विजेत्यांना भव्य पारितोषिक बहाल करण्यात येणार आहे.उत्सवाचा समारोप सुरू असलेल्या आठ दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने होणार आहे. रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी दु.३:०० वाजता गोरक्षण संस्थान मैदान, गोरक्षण रोड येथे क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत होऊन विजय चमुस मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक बहाल करण्यात येणार आहे. या आठ दिवशीय महोत्सवात युवक, युवती, महिला, पुरुषा समवेत संपूर्ण अकोलेरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा महोत्सव सफल करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या महोत्सवाच्या सफलतेसाठी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी व सलग्न संस्थांचे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते अथक परिश्रम घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत संस्थेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments