अकोला येथे कामगार भवन उभारण्यासाठी १६ कोटी ६१लक्ष रु. निधीला मान्यता...
अकोला, :- आझाद नायक न्युज दि. १० जुलै २०२५ राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी व कामगार विभागातील सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कामगार भवन उभारण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात नवीन कामगार भवनाचे बांधकाम करण्यासाठी १६ कोटींहून अधिक रकमेस वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कामगारमंत्री तथा अकोला जिल्ह्या चे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.
अकोला येथील कामगार भवन (नवीन प्रशासकीय इमारत) ८१०० चौ.मी. इतक्या क्षेत्रफळाच्या शासकीय जागेत प्रशासकीय इमारत बांधकाम व विविध सुविधांसह निर्माण होईल.
इमारत प्रशस्त असून तळमजला व त्यावर तीन मजले असतील. विद्युतीकरण, आग प्रतिबंधक, पाणी पुरवठा व मलनि:सारण, संरक्षक भिंत व गेट, अंतर्गत रस्ते, भू-विकास, पार्किंग, फर्निचर आदी बाबींसाठील १६ कोटी ६१ लाख रु. रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
अकोला येथील प्रस्तावित कामगार भवनामध्ये (प्रशासकीय इमारत) कामगार प्रभागांतर्गत असलेले सहायक कामगार आयुक्त अकोला यांचे कार्यालय, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे कार्यालय, घरेलू कामगार कल्याण मंडळ यांचे कार्यालय, अकोला-वाशिम-बुलढाणा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ यांचे व औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांचे कार्यालय स्थलांतरित करण्यात येईल.
कामगार भवन निर्माण होत असल्यामुळे कामगार बांधवांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे शक्य होईल असा विश्वास कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी व्यक्त केला.
धुळे येथील कामगार भवनाच्या कामालाही प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
0 Comments