पालिकेची कठोर कारवाई ,साहित्य जप्त ,अनेक वर्षांनंतर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
अमळनेर : शहरातील सुभाष चौक ते तिरंगा चौक दरम्यान कुंटे रस्त्यावर असलेले तात्पुरते ६० ते ७० अतिक्रमण पालिकेने कठोर कारवाई करत हटवल्याने अनेक वर्षानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. १५ जणांचे साहित्य पालिकेत जमा करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सुभाष चौक ते तिरंगा चौक हा शहरातील मुख्य रस्ता असून या रस्त्यावर किरकोळ विक्रेते हातगाड्या,दुकानाचे शेड,फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते, दुकानदारांचे बाहेर ठेवलेले साहित्य यांचे अतिक्रमण एव्हढे वाढले होते की या रस्त्याने पायी चालणे कठीण झाले होते. महिलांना धक्काबुक्की चा दररोजचा प्रकार वाढला होता. नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. लोकप्रतिनिधी,समाजसेवक, नगरसेवक मतांसाठी दुर्लक्ष करीत असल्याने कारवाई होत नव्हती.
नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कठोर भूमिका घेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाला रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले.
अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल,अविनाश बिऱ्हाडे, विकास बिऱ्हाडे,जितेंद्र चावरीया,सुनील संघेले, यांनी या रस्त्यावरील सुमारे ६० ते ७० अतिक्रमण हटवले. आणि जे अतिक्रमण काढण्यास विरोध करत होते अथवा अडथळा आणत होते अशा १५ जणांचे हातगाड्या , वजन काटे,बाहेर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तिरंगा चौक ते बसस्थानक दरम्यानचे रस्त्यावरील अतिक्रमण देखील हटवण्यात आले.
अनेक वर्षांनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. नागरिकांनी नगरपालिकेचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी केली आहे. त्याच प्रमाणे समाजसेवक,लोकप्रतिनिधी व लोकसेवकांनी अतिक्रमण हटविण्यास अडथळा आणू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुख्य रस्त्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीस अथवा नागरिकांना अडथळा आणू नये अन्यथा दररोज दंड आकारणे, साहित्य जमा करणे अशा कारवाया सुरू राहतील असे तुषार नेरकर, मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर.यांनी सांगितले
0 Comments