पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक जमावाने काही वाहनांची तोडफोड केली. किरकोळ वादातून झालेल्या हिंसक घटनेनंतर जुने शहर पोलीस ठाण्याजवळ मोठा जमाव जमला होता. या हिंसक जमावाने परिसरातील काही वाहनांना लक्ष्य केले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अकोल्याचे एस.पी. संदीप घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यां च्या आदेशानुसार अकोला शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात अकोल्यातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अकोट फाईल परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली होती.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे संतप्त झालेल्या एका गटाने तोडफोड व दगडफेक सुरू करण्यास सुरुवात केली. यानंतर दोन गटांत तूफान राडा झाला.
जुन्या शहरातील हरिहरपेठ परिसरात हे दोन्ही गट शनिवारी रात्री ११:१५ वाजताच्या सुमारास भिडले. त्यानंतर काही लोकांचा जमाव तेथील घरांवर चालून गेला.यावेळी जमावाने मोटार सायकलींचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, तर एक घरही पेटवून दिले. या घटनेत एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.
रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान जमाव पांगवण्यासाठी गोळीबारही करावा लागला.
यानंतर घटनास्थळावर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे पोलिस ताफ्या सह पोहोचले.
रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान रात्री २.३० च्या सुमारास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनीही घटनेचा आढावा घेत जुने शहर, डाबकी रोड, सिटी कोतवाली व रामदास पेठ या भागात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू केल्याचे आदेश काढले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments