आमदार भारसाकळेनी नगरपंचायतवर स्थगिती आणल्याने जनतेमध्ये नाराजी
हिवरखेड प्रतिनिधी :- धिरज बजाज
आमदार भारसाकळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत हिवरखेड नगरपंचायत वर स्थगिती आणल्याचे पत्र व्हायरल झाल्यामुळे या अन्यायाविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष उफाळला होता.
त्यामुळे सर्वत्र आमदार भारसाकळे व उपमुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या पक्षाची नाचक्की होत असल्याची चर्चा होती. जनतेतील नाराजी कमी करण्यासाठी व येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागू नये म्हणून आमदार भारसाकळे यांनी हिवरखेड वासियांना नगरपरिषद करून दाखवतो अन्यथा नगरपंचायत तर होणारच असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु आर्थिक वर्ष उलटून गेल्यावरही नगरपंचायतही झाली नाही. आणि नगरपरिषद ही झाली नाही. त्यामुळे आमदार भारसाकळे यांचे आश्वासन अद्याप पर्यंत लॉलीपॉप अथवा चॉकलेट ठरले आहे.
विशेष म्हणजे आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात वारंवार प्रश्न उपस्थित केल्यामुळे व पाठपुरावा केल्यामुळे तसेच विविध लोकप्रतिनिधी अधिकारी, कर्मचारी आणि हिवरखेड वासियांनी आपापल्या परीने अनेक वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न व विविध आंदोलने केल्यामुळे नगरपंचायतची घोषणा झालेली होती.आणि शासन दरबारी नगरपंचायतची प्रक्रिया पूर्णत्वास आलेली होती.
जर आमदार भारसाकळे यांनी नगरपंचायत वर स्थगिती आणली नसती तर आज रोजी हिवरखेड नगरपंचायत अस्तित्वात आली असती हे सत्य गावातील लहान लहान मुलांना सुद्धा माहित झाले आहे. त्यामुळे आता आमदार भारसाकळे हे पत्रव्यवहार करून नगरपरिषद ची प्रक्रिया सुरू करताना दिसत असले तरी त्यामुळे बहुमूल्य वेळ व्यर्थ जात आहे आणि जनसामान्यांमध्ये "जो बुंद से गयी वो हौद से नही आती." अशी कुजबुज सुरु आहे.
नगरपंचायतवर स्थगिती संदर्भात जनतेच्या भावना प्रदर्शित करण्यासाठी हिवरखेड नगरपंचायत समर्थकांनी एप्रिल फुलच्या दिवशी प्रतिकात्मक स्वरूपात लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटपाचा अभिनव उपक्रम केला. सदर उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. आणि सर्वसामान्य हिवरखेड वासियांनी हिवरखेड नगरपंचायत वरील स्थगिती तात्काळ उठवावी आणि हिवरखेड नगरपंचायतची अंतिम अधिसूचना जाहीर करावी अशी एकमुखी मागणी केली. सदर अभिनव उपक्रमात माजी सरपंच सुरेश ओंकारे, ग्रामपंचायत सदस्य वसीम मिर्झा, माजी ग्रामपंचायत सदस्य हिफाजत भाई, शिंदे गटाचे प्रमोद निळे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खिरोडकार, धिरज बजाज, राहुल गिऱ्हे, अनिल कवळकार, शाहरुख लाला, चंदू इंगळे, इत्यादी अनेक नगरपंचायत समर्थक नागरिक उपस्थित होते.
प्रतिक्रिया:-
श्रेयवादासाठी व दिरंगाईसाठी जाणीवपूर्वक हिवरखेड नगर पंचायत वर स्थगिती आणल्या गेली व नगरपरिषदचे लॉलीपॉप जनतेला दिले.
ते पूर्ण न झाल्यामुळे जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी एप्रिल फुल च्या दिवशी लॉली पॉप व चॉकलेट वाटपाचा अभिनव उपक्रम करण्यात आला.
सुरेश ओंकारे, माजी सरपंच हिवरखेड.
0 Comments