धुळे : - 9 ऑक्टोबर
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत 'मिशन कवच कुंडल' मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाने लसीकरण करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे, धुळे जिल्ह्याची 18 वर्षांवरील लोकसंख्या 17 लाख 18 हजार 900 एवढी आहे. त्यापैकी आतापर्यंत आठ लाख 86 हजार 692 नागरिकांचे म्हणजेच 51.83 टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे. राज्याचे हेच प्रमाण 64 टक्के आहे. त्यामुळे उर्वरित सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस व देय असलेल्या लाभार्थ्याचा दुसरा डोस तातडीने देणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी 'मिशन कवच कुंडल' मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका क्षेत्रात आयुक्तांनी आपापल्यास्तरावर कृती दलाची नियमितपणे बैठक घ्यावी. त्यासाठी शिक्षण, महिला व बालविकास, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवावे. ग्रामीण कार्यक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र हे नियोजनाचे मुख्य केंद्र असावे. संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सूक्ष्म आराखडा तयार करावा. तसेच ग्रामसेवक, तलासाठी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती यांचेही सहकार्य घ्यावे.
प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र आणि सूक्ष्म नियोजन करावे. केंद्रातील प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार तसेच शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक दिवशी लसीकरण सत्राचे आयोजन करावे. याशिवाय प्रत्येक गावाच्या लसीकरणासाठी पथके निश्चित करावीत. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना पहिला डोस प्राधान्याने द्यावा. लसीकरणासाठी आरोग्य सेविका, अधिपरिचारिका, वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टरांची मदत घ्यावी. लसीकरणासाठी लाभार्थ्यांना शिबिराच्या ठिकाणी बोलावणे, त्यांची बैठक व्यवस्था आदींची व्यवस्था अन्य विभागाच्या सहकार्याने करावी. याच प्रमाणे नागरी भागात ही नियोजन करावे.
ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहावे. तेथे आवश्यक व्यवस्थेचे नियोजन करावे. तसेच उर्वरित लाभार्थ्यांना लसीकरणासाठी बोलावण्यासाठी सहकार्य करतील. उपलब्ध लस साठ्यानुसार पुढील तीन दिवसांसाठी सत्रांचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार पुढील लस पुरवठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेस नागरिकांनी लसीकरण करून घेत सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.
0 Comments