अमळनेरमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट; नागरिकांची पाण्यासाठी वणवण
अमळनेर, दि. — शहरातील राजाराम नगर, गोहिल नगर आणि रघुराज नगर परिसरात मागील ११ दिवस उलटूनही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अक्षरशः वनवण भटकावे लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
यापूर्वीही या भागात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी समोर आल्याने नागरिकांमध्ये आरोग्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच आता सलग ११ दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
स्थानिक नागरिकांनी आझाद नायक न्यूजशी बोलताना सांगितले की, वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून लवकरच नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. आता नगरपालिकेची यावर काय भूमिका राहते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
0 Comments